देशभरात रोकडसह एटीएम मशीन लुटणारी राजस्थानी टोळी जेरबंद

SHARE:

देशभरात रोकडसह एटीएम मशीन लुटणारी राजस्थानी टोळी जेरबंद

महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रातील तब्ब्ल ११ गुन्हे उघड : दोघांना केली अटक, एकजण पसार : १० लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त : स्थानिक गुन्हे अन्वेषणची मोठी कारवाई.

देशभरातील विविध राज्यात रात्रीच्या सुमारास रोकड भरलेले एटीएम मशीन लुटणाऱ्या राजस्थानच्या टोळीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. या टोळीकडून महाराष्ट्रासह तेलंगणा, आंध्र प्रदेशातील तब्बल ११ एटीएम मशीन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. या प्रकरणी दोघांना अटक केली असून एकजण पसार आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने कर्नाटकात सदरची कारवाई केली. या चोरट्यांकडून गाड्यांसह १० लाख ६८ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बहादूर प्रल्हादराम चौकीदार बावरी (वय ३६ रा. कुलीवाना जि. डीडवाना), गोपाल तेजाराम बावरी (रा. रावलियावास जि. नागौर राजस्थान) यांना अटक केली असून त्यांचा साथीदार अर्जुन प्रेमाराम मेखवाल (रा. राजस्थान) हा पसार झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, बुधवार दि. १६ सप्टेंबर रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरटयांनी एचडीएफसी बँकेचे एटीएम मशीन पैशांसह चोरून नेले होते. सदरच्या घटनेची सांगली शहर पोलिसात नोंद करण्यात आली होती. अशाच पद्धतीने इतर राज्यातही एटीएम मशीनची चोरी झाली होती. याची गंभीर दखल घेऊन पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकास तपासाच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणचे सहाय्यक निरीक्षक प्रशांत निशाणदार यांचे पथक चोरट्यांचा शोध घेत होते. पथकातील कर्मचारी हे चोरट्यांचा शोध घेत असताना रविवार दि. २७ सप्टेंबर रोजी पथकातील कर्मचाऱ्यांना राजस्थान पासिंगची महिंद्रा पिकअप गाडी मधून सराईत गुन्हेगार बहादूर चौकीदार आणि गोपाल बावरी हे सांगलीवाडीत एटीएम मशिन चोरतानाचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले. तसेच गाडीच्या हौद मध्ये चोरीची मोटारसायकल असल्याची माहिती मिळाली. सदरच्या माहिती आधारे संशयितांचा शोध घेऊन दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी सदरचे एटीएम मशीन चोरल्याचे सांगितले. तसेच सदरचे एटीएम मशीन हे लक्ष्मी फाटा ते कसबेडिग्रज जाणाऱ्या रोडवरील उसाच्या शेतात फेकल्याची माहिती दिली. एटीएम मधील रोकड बाबत चौकशी केली असता त्यांनी बहादूर चौकीदार याच्या ताब्यातील पैसे हे त्यातीलच असून उर्वरित पैसे हे त्यांचा साथीदार पसार असलेला अर्जुन मेघवाल यांच्याकडे असल्याचे सांगितले. पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन तोडून टाकलेले एटीएम मशीन ताब्यात घेतले. दोघांकडे आणखी कसून तपास केला असता त्यांनी अशाच प्रकारे महाराष्ट्रातील नाशिक, नांदेड, सोलापूर, सांगली, तेलंगणा आणि आंध्रप्रदेश राज्यात चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडे असलेल्या दोन दुचाकी या फलटण आणि कर्नाटकातील हवेरी येथून चोरल्याचे सांगितले. यावेळी त्यांच्याकडून १५ हजार रोख, एक महिंद्रा पीकअप, दोन दुचाकी, फायर सिलेंडर, गॅस कटर, एटीएम मशीनचे तुकडे यांसह एकूण १० लाख ६८ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदरची कारवाई पोलिस निरीक्षक संजीव झाडे, सहाय्यक निरीक्षक प्रशांत निशाणदार, कर्मचारी सुभाष सूर्यवंशी, अनिल कोळेकर, सागर लवटे, नागेश खरात, अमर नरळे, सागर टिंगरे, दरिबा बंडगर, संदीप नलावडे, सतीश माने, महादेव नागणे, अमीरशा फकीर, संदीप गुरव, उदय माळी, सोमनाथ पतंगे, विनायक सुतार, विक्रम खोत, मोतीराम खोत, सुशांत चिले, गणेश शिंदे, महेश कुंभार यांच्या पथकाने केली.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *