चोरी केल्याच्या रागातून खून करणार्‍या दोघांना जन्मठेपेची शिक्षा

SHARE:

चोरी केल्याच्या रागातून खून करणार्‍या दोघांना जन्मठेपेची शिक्षा

जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल. अलकूड (एस) येथे 2022 साली घडली होती घटना

कवठेमहांकाळ तालुक्यातील अलकूड (एस) येथे वाघजाई मंदिरात चोरी तसेच सतत धमकावत असल्याच्या रागातून सदाशिव जगन्नाथ चौगुले याचा खून करणार्‍या नेर्ले येथील दोघांना न्यायालयाने दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सदरची घटना हि दि. 10 ऑगस्ट 2022 रोजी घडली होती. सौरभ विकास शिद (वय 21) आणि श्रीकांत चंद्रकांत पाटील (वय 20 दोघे रा. नेर्ले ता. वाळवा) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.एम. चंदगडे यांनी सदरची शिक्षा सुनावली. सरकारपक्षातर्फे ड. विनायक देशपांडे यांनी काम पाहिले.
खटल्याची हकीकत अशी, वाळवा तालुक्यातील वाघजाई मंदिरामध्ये 2022 साली चोरी झाल्याचा प्रकार घडला होता. यावेळी दानपेटीतील रक्कम आणि मुद्देमाल लंपास चोरट्याने लंपास केला होता. कासेगाव पोलिसांनी गुन्ह्यामध्ये मंदिराचे पुजारी असणार्‍या सौरभ शिद याचा नातेवाईक सदाशिव चौगुले (वय 29) याला अटक केली होती.
दरम्यान काही दिवसांनी चौगुले जामिनावर बाहेर आला. त्यानंतर चौगुले याने पुजारी असणार्‍या नातेवाईक सौरभ शिद याच्याकडे गुन्हा मागे घेण्यासाठी तगादा लावला होता. तर सौदे याने मंदिरातील दागिने आणि रक्कम परत दे गुन्हा मागे घेतो, असं सांगितलं होतं. त्यातून दोघांमध्ये अनेक वेळा वादाचा प्रकार घडला होता. मंदिर चोरीतील संशयित चौगुले याने पुजारी शिद याला गुन्हा मागे न घेतल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती.
यानंतर सौरभ शिद याने सदाशिव चौगुले याच्या हत्येचा कट रचत कवठेमहांकाळ येथील अलकुड ( एस) मधील लंगरपेठ रस्त्यावर चौगुले याचा पाठलाग करत धारदार शस्त्रांनी वार करत त्याचा खून केल्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केलेल्या तपासात उघड झाले.
या प्रकरणाचा तपास कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यातील तत्कालीन पोलीस उपनिरिक्षक अक्षयकुमार ठिकणे यांनी केला. सदर खटला न्यायालयात सुनावणीस आला असता फिर्यादीसह मयत सदाशिव चौगुले याच्या जवळचे नातेवाईक फितूर झाले. परंतु न्यायालयापुढे आलेले अनुषांगिक पुरावे तसेच जबाब आणि तज्ञांचा अहवाल याचा विचार करुन न्यायमूर्ती चंदगडे यांनी आरोपी सौरभ शिद आणि श्रीकांत पाटील यांना दोषी धरुन त्यांना जन्मठेप आणि 5 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *