samdoli news :    दैवगती की नशिबाचा खेळ? समडोळी हादरलं…! आईच्या चितेचा धूर आकाशात विरायच्या आधीच मुलाचे निधन

SHARE:

💔

samdoli news :    दैवगती की नशिबाचा खेळ? समडोळी हादरलं…! आईच्या चितेचा धूर आकाशात विरायच्या आधीच मुलाचे निधन : माणसाच्या आयुष्यात काही प्रसंग असे येतात की ज्यांना शब्द अपुरे पडतात, आणि हृदयच फाटून निघतं… समडोळीतील कुदळे कुटुंबावर असाच एक अकल्पित आघात कोसळला आहे.

samdoli news :    दैवगती की नशिबाचा खेळ? समडोळी हादरलं…! आईच्या चितेचा धूर आकाशात विरायच्या आधीच मुलाचे निधन

मूळचे दुधागावचे असलेले किरण कुदळे यांनी तब्बल पंचवीस वर्षांपूर्वी मिरज तालुक्यातील समडोळी गावात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. एक सामान्य पण कष्टाळू माणूस म्हणून त्यांनी येथे गावातील पहिले मेडिकल दुकान सुरू केले. प्रामाणिकपणा, मृदुभाषी स्वभाव आणि सामाजिक बांधिलकीमुळे ते अल्पावधीतच समडोळीकर झाले. गावाच्या सुखदु:खात ते कुटुंबासह सहभागी होत गेले आणि समडोळीशी मनाने एकरूप झाले.

परंतु, नियतीने जणू काही या प्रेमळ घरावरच वज्राघात करण्याचा कट रचला होता. नुकतेच किरण कुदळे यांच्या पत्नी मृणालिनी कुदळे यांचे आजारपणानंतर निधन झाले. घरातील आधारस्तंभ हरपल्याने कुटुंबावर दु:खाचे सावट दाटले. याच वेळी दूर बेंगलोर येथे नोकरीच्या निमित्ताने राहणारा लहान मुलगा सौरभ याला आईच्या निधनाची बातमी मिळाली. आईच्या शेवटच्या दर्शनासाठी तो जीवाची पर्वा न करता तात्काळ दुचाकीवरून प्रवासाला निघाला… पण काळाने त्याच्याशीही निर्दयी खेळ खेळला.

हुबळीच्या परिसरात त्याचा भीषण अपघात झाला आणि आईच्या चितेचा धूर आकाशात विरायच्या आधीच सौरभ स्वतः त्या धुरात विलीन झाला…
एका आईच्या दहनासाठी निघालेला मुलगा स्वतःच अनंतात विलीन झाला – या बातमीने केवळ कुदळे कुटुंब नाही, तर संपूर्ण समडोळी आणि दुधागाव गाव शोकमग्न झाले आहेत.

घरातले दिवे एकाचवेळी विझल्यासारखे झाले, आकाश काळवंडले, आणि गावभर एकच कुजबुज – हे नशीब की दैवगती?
मृणालिनींच्या अंत्यविधीची तयारी चालू असतानाच मुलाच्या निधनाची बातमी आली आणि शोकसभा थेट रुदनसभेत परिवर्तित झाली.

ज्यांनी गावात सेवा, स्नेह आणि संस्कारांचा दीप पेटवला, त्या कुदळे कुटुंबावर दु:खाचे इतके घनदाट सावट कधी नव्हते.
आईच्या मागोमाग गेलेल्या सौरभच्या अकाली जाण्याने प्रत्येक हृदय सुन्न झाले आहे.
समडोळी आणि दुधागाव या दोन गावांच्या आठवणींमध्ये हे दुःख कायमचं कोरलं गेलं आहे.

 ईश्वर त्यांच्या दोघांच्या आत्म्यास शांती देवो आणि या असह्य आघातातून कुदळे कुटुंबाला धैर्य लाभो — हीच सर्वांची प्रार्थना.
Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *