sangli news : स्वीकृत सदस्यांसाठी 20 नोव्हेंबरपर्यंत अर्जाची मुदत : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधील स्वीकृत सदस्य निवडीचा मार्ग मोकळा झाला. स्वीकृतसाठी 20 नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्य म्हणून संधी मिळविण्यासाठी इच्छुकांच्या हालचालींना वेग येणार आहे. जिल्हा परिषदेत सहा, तर जिल्ह्यातील दहा पंचायत समित्यांमध्ये 26 स्वीकृत सदस्यांची निवड होणार आहे.
sangli news : स्वीकृत सदस्यांसाठी 20 नोव्हेंबरपर्यंत अर्जाची मुदत
जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांच्या निवडीचा मार्ग मोकळा
महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या धर्तीवर आता जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्येही स्वीकृत सदस्य नियुक्त केले जाणार आहेत. यासाठी शासनाने काही दिवसांपूर्वी राजपत्र प्रसिद्ध केले होते. त्यानंतर निवडीच्या प्रक्रियेला सुरुवात होण्याची अपेक्षा होती. मात्र विविध कारणात्सव प्रक्रियेला ब्रेक लागला होता. आता अर्ज भरण्यासाठी 20 नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आल्याने निवडीच्या प्रक्रियेबाबत स्पष्टता आली आहे.
जिल्हा परिषदेत सध्या 61 निवडून आलेले सदस्य आहेत. त्यामध्ये सहा स्वीकृत सदस्यांची भर पडणार असून, एकूण सदस्य संख्या 67 होणार आहे. जिल्ह्यातील दहा पंचायत समित्यांमध्ये 26 स्वीकृत सदस्य निवडले जाणार आहेत. त्यामुळे पंचायत समित्यांची एकूण सदस्यसंख्या 122 वरून 148 होणार आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या मिळून एकूण 32 स्वीकृत सदस्यांना संधी मिळणार आहे.
जिल्हा परिषदेत निवडून आलेल्या सदस्य संख्येच्या 10 टक्के किंवा किमान पाच, यापैकी जी संख्या अधिक असेल तितके स्वीकृत सदस्य निवडण्याची तरतूद आहे.
त्यानुसार जिल्हा परिषदेत सहा सदस्यांची निवड होणार आहे. पंचायत समित्यांसाठी निवडून आलेल्या सदस्यांच्या 20 टक्के किंवा किमान एक, यापैकी जी संख्या अधिक असेल तितक्या सदस्यांची निवड केली जाणार आहे. त्यानुसार जिल्ह्यातील दहा पंचायत समित्यांमध्ये 26 सदस्यांना संधी मिळणार आहे.
राजकीय हालचाली वाढणार
जिल्हा बँक, शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधील 32 स्वीकृत सदस्यपदांसाठी इच्छुकांकडून जोरदार रस्सीखेच होणार आहे. पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधणे, गटनेत्यांकडे पाठपुरावा करणे आणि पक्षातील आपले स्थान मजबूत करण्यावर इच्छुकांचा भर राहणार आहे. त्यामुळे राजकीय हालचाली वाढणार आहेत.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











