vishal patil news :  “खा. पाटील आता कोणाची परतफेड करणार आणि कोणाचा विरोध करणार?”

SHARE:

vishal patil news :  “खा. पाटील आता कोणाची परतफेड करणार आणि कोणाचा विरोध करणार?” : सांगली जिल्ह्यातील राजकारण पुन्हा तापू लागले आहे. लोकसभेत अपक्ष उमेदवार म्हणून ऐतिहासिक विजय मिळवणारे खा. विशाल पाटील आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रणांगणात नव्या पेचात सापडले आहेत आता हाच सारा खेळ स्थानिक स्वराज्य निवडणुकीत वेगळ्या रेषांवर विभागला आहे. अनेक माजी जि.प. सदस्य, नगरसेवक आणि पंचायत समिती सदस्य जे लोकसभेला विशाल पाटील यांच्या पाठीशी उभे होते, ते आता वेगवेगळ्या आघाड्यांत उमेदवार म्हणून मैदानात आहेत. त्यामुळे प्रश्न असा उभा राहतो की — “खा. पाटील आता कोणाची परतफेड करणार आणि कोणाचा विरोध करणार?”

vishal patil news :  “खा. पाटील आता कोणाची परतफेड करणार आणि कोणाचा विरोध करणार?”

“खा. विशाल पाटील अडचणीत; ‘स्थानिक स्वराज्य’ची रणधुमाळी आणि ‘लोकसभेची परतफेड’”

. लोकसभेच्या वेळी ज्यांनी “संजयकाका पाटील यांचा काटा काढण्यासाठी” एकदिलाने विशाल पाटील यांना साथ दिली, ते नेते आणि कार्यकर्ते आता वेगवेगळ्या पक्षांत सक्रिय आहेत. त्यामुळे ‘लोकसभेची परतफेड’ करताना खा. पाटील यांना ‘आघाडी धर्म’ आणि ‘राजकीय कर्जफेड’ या दोन्हींचा ताण जाणवू लागला आहे.

2014 मध्ये मोदीलाटेच्या जोरावर संजयकाका पाटील खासदार झाले. 2019 मध्येही त्यांची गाडी सुरळीत धावली. पण 2024 च्या निवडणुकीत समीकरणे पालटली. काँग्रेसमध्ये असंतोष असताना, महाविकास आघाडीने विशाल पाटील यांना तिकीट नाकारले आणि त्यांनी अपक्ष म्हणून मैदान गाजवले. त्यांना अजितराव घोरपडेविलासराव जगपातजयश्रीताई पाटील यांसारख्या नेत्यांची उघड पाठराखण मिळाली. त्याचबरोबर विश्वजीत कदमरोहित पाटीलसुहास बाबरपृथ्वीराज देशमुख आदी नेत्यांच्या समर्थकांनीही त्यांच्यासाठी रात्रंदिवस प्रचार केला. परिणाम – विशाल पाटील एक लाख मतांच्या आघाडीने विजयी झाले आणि सांगली लोकसभेच्या इतिहासात नवे पान लिहिले.

पण आता परिस्थिती वेगळी आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका निवडणुका दारात आल्या आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी सरळ लढत होणार आहे. अशा वेळी खा. पाटील हे आघाडीच्या बाजूने उभे राहणार असले तरी, लोकसभेच्या काळात त्यांच्यासाठी काम केलेली मंडळी आता दुसऱ्या छावणीत आहेत.

  • मिरज महापालिका क्षेत्रात जयश्री पाटील यांनी लोकसभेला पाठिंबा दिला, पण आता त्या भाजपमध्ये आहेत.
  • खानापूर-आटपाडीत सुहास बाबर आणि तानाजी पाटील समर्थकांनी त्यांच्यासाठी मोर्चा उघडला होता.
  • पलूस-कडेगावात विश्वजीत कदम गट, तर कवठेमहांकाळात अजितराव घोरपडे गट सक्रिय होता.
  • जत मतदारसंघात विलासराव जगपात यांनी पक्षविरोधी भूमिकेतून साथ दिली होती.

महाविकास आघाडीच्या धर्मापेक्षा ‘उपकाराची परतफेड’ मोठी ठरणार का?
की लोकसभेतील साथ आता विसरून खा. पाटील पक्षनिष्ठेला प्राधान्य देणार?

याचदरम्यान आणखी एक संवेदनशील समीकरण म्हणजे — आ. जयंतराव पाटील आणि खा. विशाल पाटील यांचा कायम दुरावा. दोघांमधील वाद प्रत्येक निवडणुकीत प्रकर्षाने समोर येतो. विशेषतः महापालिका निवडणुकीत हा संघर्ष अधिक तीव्र होईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यात आघाडीच्या तळातही मतभेद उफाळण्याची चिन्हे दिसत आहेत.

सांगलीचे राजकारण नेहमीच समीकरणांच्या जाळ्यात गुंतलेले राहिले आहे. पण यावेळी समीकरणे अधिक गुंतागुंतीची आहेत — कारण खा. विशाल पाटील यांच्या पाठीशी असलेलेच आता त्यांच्या आघाडीसमोर उभे ठाकले आहेत.
म्हणूनच जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सध्या एकच प्रश्न घुमतो —
“खा. विशाल पाटील ‘स्थानिक स्वराज्या’त कोणाच्या बाजूने उभे राहणार — आघाडीच्या की उपकारकर्त्यांच्या?”

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *